Sunday, 29 March 2026

दिनविशेष माहिती - 30 मार्च ( Rajasthan Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 30 मार्च हा राजस्थान स्थापना दिवस त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण राजस्थान या राज्याविषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

         राजस्थान स्थापना दिवस
भारताच्या पश्चिम भागात वसलेले राजस्थान हे क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात मोठे राज्य आहे. ३० मार्च १९४९ रोजी विविध संस्थानांचे एकत्रीकरण होऊन राजस्थान राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे दरवर्षी ३० मार्च हा दिवस राजस्थान स्थापना दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
स्वातंत्र्यपूर्व काळात राजस्थानमध्ये जयपूर, जोधपूर, बिकानेर, उदयपूर इत्यादी अनेक लहानमोठी संस्थाने होती. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने या संस्थानांचे एकत्रीकरण करून एकसंध राज्य निर्माण करण्याचा निर्णय घेतला. दिनांक ३० मार्च १९४९ रोजी राजस्थान राज्य अस्तित्वात आले.
राजस्थान हे आपल्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककलेसाठी प्रसिद्ध आहे. राजस्थानचे घुमर लोकनृत्य खूप प्रसिद्ध आहे. तसेच रंगीबेरंगी पोशाख, दागिने आणि वाळवंटी जीवनशैली हे सर्व जगभर आकर्षणाचे केंद्र आहे. राजस्थानी खाद्यसंस्कृतीत दाल-बाटी-चूरमा विशेष प्रसिद्ध आहे. हिंदी व राजस्थानी ही राजस्थानमधील प्रमुख बोलली जाणारी भाषा आहेत. राजस्थान मधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे भारतातील एक प्रमुख व्याघ्रप्रकल्प म्हणून गणले जाते. राजस्थानमध्ये उंट हा रोजच्या जीवनात वापरला जाणारा प्राणी आहे.
राजस्थान स्थापना दिवस हा केवळ राज्याच्या निर्मितीचा दिवस नसून एकतेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. राज्यातील लोक आपली परंपरा जपण्यासाठी आणि पुढील पिढ्यांना तिची ओळख करून देण्यासाठी हा दिवस साजरा करतात.
राजस्थानमध्ये अनेक ऐतिहासिक किल्ले, राजवाडे आणि वाळवंटी प्रदेश आहेत. जयपूर, उदयपूर, जोधपूर आणि जैसलमेर ही शहरे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. राजस्थानची राजधानी जयपूरला गुलाबी शहर किंवा “पिंक सिटी” म्हणून ओळखले जाते तसेच जंतर मंतर व हवामहलसाठी देखील जयपूर प्रसिद्ध आहे. जैसलमेरची “गोल्डन सिटी” पर्यटकांना विशेष आकर्षित करतात. विविधतेत एकता आणि परंपरेचे जतन यांचे सुंदर उदाहरण म्हणजे राजस्थान होय. या दिवसाच्या निमित्ताने आपणही भारताच्या सांस्कृतिक वैभवाचा अभिमान बाळगूया.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - राजस्थान राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
बरोबर उत्तर आहे, 30 मार्च 1949 रोजी राजस्थान राज्याची निर्मिती झाली.

दुसरा प्रश्न - राजस्थानची राजधानी कोणती ?
बरोबर उत्तर आहे, जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे. 

तिसरा प्रश्न - राजस्थानचे कोणते लोकनृत्य खूप प्रसिद्ध आहे ?
बरोबर उत्तर आहे, राजस्थानचे घुमर लोकनृत्य खूप प्रसिद्ध आहे. 

चौथा प्रश्न - राजस्थानमध्ये रोजच्या जीवनात वापरला जाणारा प्राणी कोणता आहे. ?
बरोबर उत्तर आहे, राजस्थानमध्ये उंट हा रोजच्या जीवनात वापरला जाणारा प्राणी आहे.

शेवटचा पाचवा प्रश्न - क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
बरोबर उत्तर आहे - क्षेत्रफळानुसार राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Friday, 27 March 2026

दिनविशेष माहिती - 28 मार्च ( Guru Angad dev )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 28 मार्च शीख धर्माचे दुसरे गुरु अंगद देव यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण गुरु अंगद देव यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

शीख धर्माचे दुसरे गुरु अंगद देव

शीख धर्मातील महान गुरुंपैकी गुरु अंगद देव यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. ते शीख धर्माचे दुसरे गुरु होते. त्यांचा जन्म 31 मार्च 1504 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांचे मूळ नाव ‘भाई लहणा’ असे होते. शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु म्हणजे गुरु नानक देव यांच्या शिकवणीने प्रेरित होऊन गुरु अंगद देव यांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले आणि पुढे तेच शीख पंथाचे दुसरे गुरु झाले.
गुरु अंगद देव यांनी आपल्या आयुष्यात समाजसेवा, शिक्षण आणि समानतेचा संदेश दिला. त्यांनी सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र आणून मानवतेचा विचार रुजवला. त्यांच्या कार्यातील सर्वात मोठे योगदान म्हणजे गुरुमुखी लिपीचा प्रसार होय. या लिपीमुळे सामान्य लोकांनाही ज्ञान मिळणे सोपे झाले आणि शीख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब सर्वांपर्यंत पोहोचले.
त्यांनी शारीरिक व मानसिक विकासावरही भर दिला. मुलांमध्ये शिक्षणाबरोबरच व्यायामाची सवय लागावी म्हणून त्यांनी व्यायामशाळा सुरू केल्या. समाजातील अंधश्रद्धा, भेदभाव आणि अन्याय यांना त्यांनी विरोध केला. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सेवा या मूल्यांचा त्यांनी प्रचार केला.
दिनांक 28 मार्च 1552 रोजी त्यांचे निधन झाले. गुरु अंगद देव यांच्या कार्यामुळे शीख धर्म अधिक बळकट झाला. त्यांचे जीवन आपल्याला सेवा, समानता आणि शिक्षण यांचे महत्त्व शिकवते. त्यामुळे त्यांची पुण्यतिथी आपल्याला प्रेरणा देणारा आणि आदर्शांचा विचार करण्याचा दिवस ठरतो. 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - गुरु अंगद देव यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, गुरु अंगद देव यांचा जन्म 31 मार्च 1504 रोजी पंजाबमध्ये झाला.

दुसरा प्रश्न - शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु कोण होते ? 
बरोबर उत्तर आहे, गुरु नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु होते. 

तिसरा प्रश्न - गुरुमुखी लिपीचा प्रसार कोणी केला ?
बरोबर उत्तर आहे, गुरु अंगद देव यांनी गुरुमुखी लिपीचा प्रसार केला. 

चौथा प्रश्न - शीख धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता ?
बरोबर उत्तर आहे, गुरु ग्रंथ साहिब हा शीख धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - गुरु अंगद देव यांचे निधन केव्हा झाले ? 
बरोबर उत्तर आहे - दिनांक 28 मार्च 1552 रोजी गुरु अंगद देव यांचे निधन झाले. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Thursday, 26 March 2026

दिनविशेष माहिती - 27 मार्च ( Yuri गगरीन )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 27 मार्च पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले अंतराळवीर युरी गागरीन यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने 
 आजच्या कार्यक्रमात आपण युरी गागरीन यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर – युरी गागरीन 
मानवाच्या जिज्ञासू स्वभावामुळे त्यांनी नेहमीच आकाशाकडे पाहून अंतराळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना यश देणारे पहिले अंतराळवीर म्हणजे यूरी गागरिन होय. त्यांनी 12 एप्रिल 1961 रोजी अंतराळात जाऊन पृथ्वीची प्रदक्षिणा करून मानव इतिहासात एक नवा अध्याय लिहिला.
यूरी गागरिन यांचा जन्म 9 मार्च 1934 रोजी सोवियत युनियन मधील एका छोट्या गावात झाला. त्यांचे बालपण अत्यंत साध्या कुटुंबात गेले. लहानपणापासून त्यांना विमान उडवण्याची खूप आवड होती. त्यांनी शिक्षण पूर्ण करून वैमानिक प्रशिक्षण घेतले आणि पुढे अंतराळवीर म्हणून त्यांची निवड झाली.
12 एप्रिल 1961 हा दिवस मानवजातीसाठी ऐतिहासिक ठरला. या दिवशी गगारिन यांनी वोस्टॊक वन या अंतराळयानातून अवकाशात झेप घेतली. त्यांनी सुमारे 108 मिनिटांत पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण केली. अंतराळात गेलेले ते पहिले मानव ठरले. अंतराळातून त्यांनी “पृथ्वी खूप सुंदर दिसते” असे उद्गार काढले, जे आजही प्रसिद्ध आहेत.
गागरिन यांच्या या यशामुळे अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठी क्रांती घडली. त्यांच्या कामगिरीमुळे जगभरातील वैज्ञानिकांना प्रेरणा मिळाली आणि अंतराळ स्पर्धेला वेग आला. अनेक देशांनी अंतराळ मोहिमा सुरू केल्या आणि नवीन संशोधनाला चालना मिळाली.
दुर्दैवाने, 27 मार्च 1968 रोजी विमान अपघातात यूरी गगारिन यांचे निधन झाले. मात्र त्यांचे कार्य आणि योगदान आजही अमर आहे. त्यांच्या सन्मानार्थ 12 एप्रिल हा दिवस “आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस” म्हणून साजरा केला जातो.
यूरी गगारिन यांनी मानवाला अंतराळाच्या नव्या युगात प्रवेश करून दिला आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
आज त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने युरी गागरीन यांना विनम्र अभिवादन 🙏

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - यूरी गागरिन यांचा जन्म केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे, यूरी गागरिन यांचा जन्म 9 मार्च 1934 रोजी सोवियत युनियन मधील एका छोट्या गावात झाला. 

दुसरा प्रश्न - यूरी गागरिन यांना लहानपणापासून कशाची आवड होती ? 
बरोबर उत्तर आहे, यूरी गागरिन यांना लहानपणापासून विमान उडवण्याची खूप आवड होती. 

तिसरा प्रश्न - यूरी गागरिन यांनी किती मिनिटांत पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण केली ?
बरोबर उत्तर आहे, यूरी गागरिन यांनी त्यांनी सुमारे 108 मिनिटांत पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण केली. 

चौथा प्रश्न - यूरी गागरिन यांनी अंतराळातून कोणते उद्गार काढले ?
बरोबर उत्तर आहे, यूरी गागरिन यांनी अंतराळातून “पृथ्वी खूप सुंदर दिसते” असे उद्गार काढले.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - यूरी गगारिन यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - 27 मार्च 1968 रोजी विमान अपघातात यूरी गगारिन यांचे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Tuesday, 24 March 2026

दिनविशेष माहिती - 25 मार्च ( Vasant Govarikar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
आज 25 मार्च अर्थात अवकाश संशोधन व हवामान क्षेत्रातील महान शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांची जयंती त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण डॉ. वसंत गोवारीकर यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर
भारत देशात अनेक महान शास्त्रज्ञ झाले, ज्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यापैकी एक प्रमुख नाव म्हणजे डॉ. वसंत गोवारीकर. ते एक प्रतिभावान शास्त्रज्ञ, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ होते.
डॉ. वसंत गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडील इंजिनियर होते. लहानपणापासूनच त्यांना विज्ञान आणि संशोधनाची आवड होती. त्यांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने उच्च शिक्षण पूर्ण केले. लंडनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी मास्टर्स आणि डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. विज्ञान क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
ते विशेषतः अवकाश संशोधन क्षेत्राशी संबंधित होते. त्यांनी थुंबा येथील भारताच्या अवकाश संशोधन संस्थेत म्हणजेच ISRO मध्ये महत्त्वाची भूमिकाjw बजावली. भारताच्या उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी रॉकेट तंत्रज्ञानाच्या विकासातही महत्त्वाचे कार्य केले. डॉ. वसंत गोवारीकर हे मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते.
वसंत गोवारीकर यांनी केवळ अवकाश क्षेत्रातच नव्हे तर हवामानशास्त्र आणि पावसाच्या अंदाजाबाबतही संशोधन केले. त्यांनी ‘मॉन्सून मॉडेल’ विकसित करून पावसाचा अंदाज अधिक अचूक करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्यामुळे शेती आणि अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला.
त्यांनी शिक्षण क्षेत्रातही मोठे योगदान दिले. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आणि विज्ञानाची आवड निर्माण केली. ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते.
त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल भारतीय खगोल मंडळाच्या वतीने आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आला होता. भारत सरकारच्या वतीने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे सन्मान देऊन गौरविण्यात आले होते. ते भारतातील नामांकित शास्त्रज्ञांपैकी एक मानले जातात. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दिनांक ०२ जानेवारी २०१५ रोजी मृत्यू झाला. 
वसंत गोवारीकर यांचे जीवन आपल्याला कष्ट, जिद्द आणि ज्ञानाची महती शिकवते. आज डॉ. वसंत गोवारीकर यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम ! 🙏

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - डॉ. वसंत गोवारीकर यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. वसंत गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला.

दुसरा प्रश्न - डॉ. वसंत गोवारीकर यांना लहानपणापासूनच कशाची आवड होती ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. वसंत गोवारीकर यांना लहानपणापासूनच विज्ञान आणि संशोधनाची आवड होती.

तिसरा प्रश्न - पावसाचा अंदाज अचूक व्यक्त करण्यासाठी डॉ. वसंत गोवारीकर यांनी कोणते मॉडेल तयार केले ?
बरोबर उत्तर आहे, पावसाचा अंदाज अचूक व्यक्त करण्यासाठी डॉ. वसंत गोवारीकर यांनी मान्सून मॉडेल तयार केले.

चौथा प्रश्न - भारतीय खगोल मंडळाच्या वतीने डॉ. वसंत गोवारीकर यांना कोणता पुरस्कार देण्यात आला होता ? 
बरोबर उत्तर आहे, भारतीय खगोल मंडळाच्या वतीने डॉ. वसंत गोवारीकर यांना आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आला होता. 

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - डॉ. वसंत गोवारीकर यांचा मृत्यू केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे - दिनांक ०२ जानेवारी २०१५ रोजी पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉ. वसंत गोवारीकर यांचा मृत्यू झाला. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Monday, 23 March 2026

दिनविशेष माहिती 24 मार्च ( TB )

    नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 24 मार्च अर्थात जागतिक क्षयरोग दिवस तेव्हा आजच्या कार्यक्रमात आपण क्षयरोग या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

     जागतिक क्षयरोग दिन – 24 मार्च
जागतिक स्तरावर आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध दिवस साजरे केले जातात. त्यापैकी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो. हा दिवस क्षयरोग ज्यास आपण (TB) या नावाने ओळखतो, याचा मुख्य उद्देश क्षयरोगाबद्दल (TB) जागरूकता निर्माण करणे आणि या आजाराचे निर्मूलन करणे हा आहे.
या दिवसाचा इतिहास डॉ. रॉबर्ट कोच यांच्याशी जोडलेला आहे. डॉ. रॉबर्ट कोच यांनी 24 मार्च 1882 रोजी क्षयरोगाचा जंतू (Mycobacterium tuberculosis) शोधून काढले. त्यांच्या या शोधामुळे क्षयरोगाच्या निदान आणि उपचाराला मोठी मदत झाली. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो.

क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे. तो मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो, परंतु शरीरातील इतर अवयवांना देखील बाधित करू शकतो. हा आजार संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकताना हवेत पसरतो. सतत खोकला, वजन कमी होणे, ताप येणे, रात्री घाम येणे ही त्याची मुख्य लक्षणे आहेत.
World Health Organization (WHO) च्या मते, क्षयरोग हा अजूनही जगातील मोठ्या आरोग्य समस्यांपैकी एक आहे. विशेषतः विकसनशील देशांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. योग्य वेळी उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो.
क्षयरोग टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करायला हवे जसे की, स्वच्छता राखणे, पौष्टिक आहार घेणे, खोकताना तोंड झाकणे, वेळेवर तपासणी व उपचार करणे, BCG लसीकरण घेणे.
दरवर्षी या दिवसासाठी वेगवेगळी संकल्पना (Theme) दिली जाते, ज्याद्वारे लोकांमध्ये जागरूकता वाढवली जाते. सरकार व विविध आरोग्य संस्था मोफत तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करून देतात.
शेवटी, क्षयरोग हा घातक असला तरी योग्य माहिती, वेळेवर निदान आणि उपचार यांच्या मदतीने त्यावर नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहून स्वतःचे व समाजाचे आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे.
“क्षयरोगमुक्त भारत” हे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - जागतिक क्षयरोग दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ?
बरोबर उत्तर आहे,  24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो.

दुसरा प्रश्न - क्षयरोग ज्यास आपण कोणत्या नावाने ओळखतो ?
बरोबर उत्तर आहे, क्षयरोग ज्यास आपण (TB) या नावाने ओळखतो.

तिसरा प्रश्न - क्षयरोगाचा जंतूचा शोध कोणी लावला ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाचा जंतूचा शोध लावला.

चौथा प्रश्न - डॉ. रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाचा जंतूचा शोध केव्हा लावला ?
बरोबर उत्तर आहे,  रॉबर्ट कोच यांनी 24 मार्च 1882 रोजी क्षयरोगाचा जंतू शोधून काढला.
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - WHO चे full form सांगा.
बरोबर उत्तर आहे - World Health Organization (WHO)

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Sunday, 22 March 2026

दिनविशेष माहिती - 23 मार्च ( Shahid Diwas )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 23 मार्च अर्थात शहीद दिवस त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण भारतीय स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्या क्रांतीवीरांची माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

         23 मार्च - शहीद दिवस 
भारताचा स्वातंत्र्यलढा हा त्याग, बलिदान आणि देशप्रेमाची प्रेरणादायी गाथा आहे. या लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा शूर वीरांच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून वीरांना वंदन केले जाते. 
23 मार्च 1931 हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांना ब्रिटिश सत्तेने फाशी दिली. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत बलिदान दिले आणि संपूर्ण देशाला प्रेरणा दिली.
या घटनेमागे एक महत्त्वाचा इतिहास आहे. पंजाब केसरी म्हणून ओळखले जाणारे लाला लाजपत राय हे एक महान राष्ट्रभक्त नेते होते. 1928 मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन करत असताना ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. रामाप्रसाद बिस्मिल यांच्या “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है।” ह्या गीताने अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली. लाला लाजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी ब्रिटिश अधिकारी सॉन्डर्सवर हल्ला केला. ही घटना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली.
भगतसिंग हे अत्यंत धाडसी आणि विचारशील क्रांतिकारक होते. त्यांनी “इन्कलाब जिंदाबाद” ही घोषणा देऊन तरुणांना जागृत केले. राजगुरू आणि सुखदेव यांनीही त्यांच्या सोबत निडरपणे स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.
शहीद दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत केली जाते.
हा दिवस आपल्याला शिकवतो की स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही, तर अनेक वीरांच्या बलिदानातून मिळाले आहे. त्यामुळे आपण आपल्या देशाबद्दल निष्ठा आणि कर्तव्यभावना ठेवली पाहिजे.
शहीद दिवस हा प्रेरणादायी दिवस आहे. लाला लाजपत राय यांच्या त्यागापासून ते भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानापर्यंतचा हा इतिहास आपल्याला देशप्रेम, धैर्य आणि त्याग यांचे मूल्य शिकवतो. त्यांच्या आदर्शांवर चालणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांना ब्रिटिश सत्तेने कोणत्या तारखेला फाशी दिली ?
बरोबर उत्तर आहे, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांना ब्रिटिश सत्तेने 23 मार्च 1931 रोजी फाशी दिली.

दुसरा प्रश्न - सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले ?
बरोबर उत्तर आहे, सन 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आले

तिसरा प्रश्न - पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, लाला लाजपत राय यांना पंजाब केसरी म्हणून ओळखले जाते.

चौथा प्रश्न - सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन करत असताना कोणाचा मृत्यू झाला ?
बरोबर उत्तर आहे, सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन करत असताना लाला लाजपत राय यांचा मृत्यू झाला.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - भगतसिंग यांनी कोणती घोषणा देऊन तरुणांना जागृत केले ?
बरोबर उत्तर आहे - भगतसिंग यांनी “इन्कलाब जिंदाबाद” ही घोषणा देऊन तरुणांना जागृत केले. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Saturday, 21 March 2026

जागतिक कविता दिवस - 21 मार्च ( World Poem Day )

     जागतिक कविता दिनानिमित्त 
" मनातील भावनांना वाट मोकळे करून देणारे शब्द म्हणजे कविता "

।। शुभेच्छा ।।

कवींच्या कवितेला शुभेच्छा
कवयित्रींच्या कवनाला शुभेच्छा
वारकरीच्या भजनाला शुभेच्छा
कबिरांच्या दोह्याला शुभेच्छा

तमाशातल्या लावणीला शुभेच्छा
नाटकातील पद्याला शुभेच्छा
चित्रपटातील गाण्याला शुभेच्छा
शाहिराच्या पोवाड्याला शुभेच्छा

तुकारामाच्या अभंगाला शुभेच्छा
ज्ञानेश्वरांच्या ओव्याला शुभेच्छा
एकनाथांच्या भारुड्याला शुभेच्छा
रामदासांच्या दासबोधाला शुभेच्छा

महात्मा फुलेंच्या अखंडला शुभेच्छा
सावित्रीबाईंच्या बावनकशीला शुभेच्छा
काव्य रचणाऱ्या कवीमनाला शुभेच्छा
काव्य वाचणाऱ्या वाचकांना शुभेच्छा 

- नासा येवतीकर, येवती
ता. धर्माबाद जि. नांदेड 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
।। कविता ।।

शब्द हेच धन शब्द हेच मन
शब्दामुळेच जिवंत आहे तन

कवितेतील शब्द बोलाविते मला
कवितेतील शब्द जगविते मला

कवितेमध्येच गुंतला माझा प्राण
कवितेनेच दिलाय मान सन्मान

- नासा येवतीकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
।। कविता ।।

शब्दांमागून शब्द आले
मनात आले लिहीत गेलो
अनुभवाचे काही विचार
काव्यामधून व्यक्त केलो

कमी शब्दांत जास्त विचार
कवितेतून होतो साकार
आपल्या मनातील भावनांना
कवी कवितेतून देतो आकार

शब्द हेच त्यांचे धन
शब्द हीच त्यांची संपत्ती
शब्दांचे भाव जोडले की
होते नव्या कवितेची उत्पत्ती

कविता वाचायला सोपी पण
समजायला अवघड असते
शब्दांमधून उतरलेल्या भावना
कवींचे हळवे मन सांगते

- नासा येवतीकर, 9423625769
21 मार्च 2020 @ 08:02 pm
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
।। कविता ।।

कविता कशी करावी ?
साधी करावी, सोपी करावी
दुसऱ्यांना समजेल अन
उमजेल अशी करावी

कविता कोठे करावी ?
घरात करावी, बाहेर करावी
ज्याठिकाणी सुचत असेल
त्याठिकाणी लगेच करावी

कविता कोणावर करावी ?
आई वर करावी
बायको वर करावी
जीवापाड प्रेम करणाऱ्या
जुन्या प्रेयसीवर करावी

कविता का करावी ?
मन समाधानासाठी करावी
कुणाचे तरी दुःख दूर
सारण्यासाठी करावी

- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
जागतिक कविता दिनानिमित्त सर्व कवी व कवयित्री यांना मनापासून शुभेच्छा ....!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगणे कसे असावे ? 

जगतात किडे मुंगी ही
जगण्याला अर्थ असावे
आपले जगणे कसे असावे ?

कोणी आठवण काढेल
आपले काम असे असावे
आपले जगणे कसे असावे

चार माणसात नाव निघेल
आपले वागणे असे असावे
आपले जगणे कसे असावे ?

कुणालाही दुखावणार नाही
आपले बोलणे असे असावे
आपले जगणे कसे असावे ?

डोक्यात उच्च विचार ठेवावे
आपले राहणे असे असावे
आपले जगणे कसे असावे ?

शंभर दिवस शेळी होण्यापेक्षा
एक दिवस सिंहासारखे जगावे
आपले जगणे कसे असावे ?

- नासा येवतीकर, येवती
ता. धर्माबाद जि. नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कविता - जीवनगाणे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
........ कविता ........

जो तो उठतो नि करतो कविता
म्हणतो सर्वाना कशी वाटली कविता

चार दोन शब्दाची करतो कविता
म्हणतो माझा प्राण आहे कविता

कवींचे मन सांगत असते कविता
कवींच्या भावना कळवते कविता

मनोरंजनासाठी वाचावी का कविता ?
विरंगुळा म्हणून लिहावी का कविता ?

सर्वाना हवीहवीशी वाटते कविता
मनातल्या भावना व्यक्त करते कविता

- नासा@26
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आज जागतिक कविता दिवस त्यानिमित्ताने दोन शब्द .......
साहित्यिक मित्रांनो, कुणाचे साहित्य चोरी करू नका. इतरांचे साहित्य आवडले असेल तर प्रामाणिकपणे त्यांच्या नावासकट पुढे पाठवत राहावे. स्वनिर्मिती मध्ये जो आनंद असतो तो आनंद साहित्य चोरी करून आपल्या नावाने publish करण्यात कधीच नसते. म्हणून सध्याच्या काळात जी साहित्याची चोरी जे की फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ती थांबवू या, एवढीच विनंती .........!

जागतिक कविता दिनानिमित्त वरील कविता आवडली तर मनातून शुभेच्छा द्या 
....... धन्यवाद ....

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769



दिनविशेष माहिती - 30 मार्च ( Rajasthan Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !   मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आज 30 मार्च हा राजस्थान...